‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ ची शतकी झेप
एखादी गाजलेली कलाकृती नव्या स्वरुपात तितक्याच ताकदीनं प्रेक्षकांसमोर सादर करणं हे खुप मोठ्ठं आव्हान आहे. पण ते आव्हान समर्थपणे पेलून दाखवलं आहे ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या नाटकाच्या टीमनं. दिनू पेडणेकर आणि सोनाली कुलकर्णी निर्मित ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या नाटकाने शतकी झेप घेऊन रसिक-प्रेक्षकांच्या हृदयात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. या नाटकाचा शंभरावा प्रयोग येत्या ११ मे २०१४ रोजी शिवाजी मंदिर येथे दुपारी ३.३० वाजता सादर झाला. या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव, अभिनय देव, अरुण काकडे, रवि जाधव, स्वानंद किरकिरे, हृषीकेश जोशी, मृणाल कुलकर्णी, मुक्ता बर्वे, निर्मिती सावंत असे चित्रपट-नाट्य तसेच माध्यम क्षेत्रातील अनेक सुप्रसिद्ध कलाकार यावेळी उपस्थित होते. यावेळी सोनाली कुलकर्णीने आपले मनोगत व्यक्त करतांना रसिका जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सर्व तंत्रज्ञांचा सत्कार सीमा देव आणि अरुण काकडे यांच्याहस्ते करण्यात आला.
अभिनेते मिलिंद फाटक आणि अभिनेत्री रसिका जोशी यांच्या लेखन-अभिनयातून साकारलेल्या ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’या नाटकाने रंगमंचावर मोठा इतिहास घडवला होता. हे नाटक लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच रसिका जोशी यांच्या अकाली निधनामुळे मराठी रंगभूमीला जबरदस्त धक्का बसला. तरीही रसिका जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही अप्रतिम कलाकृती वाया जाऊ नये यासाठी ‘शो मस्ट गो ऑन’ या तत्वानुसार सोनाली कुलकर्णी, मिलिंद फाटक आणि गिरीश जोशी यांनी हे नाटक पुन्हा एकदा नव्या स्वरुपात रंगमंचावर आणले. आता हे नाटक शंभरावा टप्पा पार करत आहे.
या यशाबद्दल बोलताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या रसिका जोशी यांच्या आठवणीने भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’च्या या महत्त्वपूर्ण यशामध्ये रसिका जोशी यांची अनुपस्थिती आजही प्रकर्षाने जाणवत आहे. मी स्वतः रसिकाची मोठी चाहती होते. नाटकातील रसिका आणि मिलिंद फाटक यांच्या प्रगल्भ अभिनयातून साकारलेलं ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ हे नाटक मला प्रचंड भावलं होतं. इतकंच नव्हे तर या नाटकाची व्यावसायिक निर्मिती आपण करावी अशी माझी इच्छा होती. दिनू पेडणेकर हे त्यावेळी या नाटकाची निर्मिती करत होते. पण रसिकाच्या निधनानंतर या नाटकाचे प्रयोग थांबले होते. त्यानंतर मिलिंद फाटक यांनी हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आणण्याचं ठरवलं आणि भक्ती देशमुख या व्यतिरेखेसाठी जेव्हा त्यांनी मला विचारलं तेव्हा मी लगेचच होकार दिला. इतकंच नव्हे तर एक चांगली संहिता वाया जाऊ नये, तिला शंभर टक्के न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेऊन नवी भक्ती देशमुख उभी केली. त्यामुळे या नाटकाला प्रेक्षकांचा आजही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.-