‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ ची शतकी झेप शिवाजी मंदिर येथे होणार शंभरावा प्रयोग


एखादी गाजलेली कलाकृती नव्या स्वरुपात तितक्याच ताकदीनं प्रेक्षकांसमोर सादर करणं हे खुप मोठ्ठं आव्हान आहे. पण ते आव्हान समर्थपणे पेलून दाखवलं आहे व्हाइट लिली आणि नाइट रायडर या नाटकाच्या टीमनं. दिनू पेडणेकर आणि सोनाली कुलकर्णी निर्मित व्हाइट लिली आणि नाइट रायडर या नाटकाने शतकी झेप घेऊन रसिक-प्रेक्षकांच्या हृदयात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. या नाटकाचा शंभरावा प्रयोग येत्या ११ मे २०१४ रोजी शिवाजी मंदिर येथे दुपारी ३.३० वाजता सादर होणार आहे. या प्रसंगी अभिनेते रमेश देव, सीमा देव, अभिनय देव, अरुण काकडे, रवि जाधव, स्वानंद किरकिरे, वैशाली सामंत, जितेंद्र जोशी, हृषीकेश जोशी यांच्यासह चित्रपट-नाट्य तसेच माध्यम क्षेत्रातील प्रख्यात व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.   
अभिनेते मिलिंद फाटक आणि अभिनेत्री रसिका जोशी यांच्या लेखन-अभिनयातून साकारलेल्या व्हाइट लिली आणि नाइट रायडरया नाटकाने रंगमंचावर मोठा इतिहास घडवला होता. हे नाटक लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच रसिका जोशी यांच्या अकाली निधनामुळे मराठी रंगभूमीला जबरदस्त धक्का बसला. तरीही रसिका जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही अप्रतिम कलाकृती वाया जाऊ नये यासाठी शो मस्ट गो ऑन या तत्वानुसार सोनाली कुलकर्णी, मिलिंद फाटक आणि गिरीश जोशी यांनी हे नाटक पुन्हा एकदा नव्या स्वरुपात रंगमंचावर आणले. आता हे नाटक शंभरावा टप्पा पार करत आहे.
या यशाबद्दल बोलताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या रसिका जोशी यांच्या आठवणीने भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की,व्हाइट लिली आणि नाइट रायडरच्या या महत्त्वपूर्ण यशामध्ये रसिका जोशी यांची अनुपस्थिती आजही प्रकर्षाने जाणवत आहे. मी स्वतः रसिकाची मोठी चाहती होते. नाटकातील रसिका आणि मिलिंद फाटक यांच्या प्रगल्भ अभिनयातून साकारलेलं व्हाइट लिली आणि नाइट रायडर हे नाटक मला प्रचंड भावलं होतं. इतकंच नव्हे तर या नाटकाची व्यावसायिक निर्मिती आपण करावी अशी माझी इच्छा होती. दिनू पेडणेकर हे त्यावेळी या नाटकाची निर्मिती करत होते. पण रसिकाच्या निधनानंतर या नाटकाचे प्रयोग थांबले होते. त्यानंतर मिलिंद फाटक यांनी हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आणण्याचं ठरवलं आणि भक्ती देशमुख या व्यतिरेखेसाठी जेव्हा त्यांनी मला विचारलं तेव्हा मी लगेचच होकार दिला. इतकंच नव्हे तर एक चांगली संहिता वाया जाऊ नये, तिला शंभर टक्के न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेऊन नवी भक्ती देशमुख उभी केली. त्यामुळे या नाटकाला प्रेक्षकांचा आजही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
व्हाइट लिली आणि नाइट रायडर हे नाटक हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्येही रुपांतरित करण्यात आलं आहे. त्यासाठी कलाकार तसेच बॅकस्टेज आर्टिस्ट न बदलता संपूर्ण टीमसह आम्ही हे नाटक सादर केले होते. या आवृत्त्यांच्या पहिल्या खेळालाही प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली होती अशी आठवणही सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली.

अनामिका व सोकुल निर्मित आणि साईसाक्षी प्रकाशित व्हाइट लिली आणि नाइट रायडर या नाटकाने पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, इंदोर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रयोग सादर केले आहेत. तसेच स्कॉटलंड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या युरोपीय मराठी स्नेह-संमेलनातही या नाटकाचा प्रयोग सादर केला होता. त्यालाही परदेशात स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. एक आगळीवेगळी कलाकृती असलेल्या या नाटकाचा प्रयोग सादर करण्यासाठी परदेशातून तसेच देशातील विविध शहरातून निमंत्रणे येत असल्याचेही सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. 
 
;