‘दिल चाहता है’, ‘गाभ्रीचा पाऊस’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आणि आपल्या वेगळ्या अभिनयाची चुणूक दाखवणारी सोनाली कुलकर्णी आज हिंदी आणि मराठी अशा दोन्हीही फिल्म इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे. रंगभूमीवरून आपल्या अभिनयाला सुरवात केल्यानंतर अनेक गाजलेल्या हिंदी सिनेमा-नाटकांमध्ये सोनालीने काम केले. हिंदी सिनेमांमद्ये काम करत असताना मराठी सिनेमांमध्येही सोनालीने अनेक चांगल्या भूमिका करायला सुरवात केली. सोबतच अनेक प्रायोगिक हिंदी, मराठी आणि इंग्रजी नाटकांमध्येही तिचे काम चालू होतेच. त्यानंतर ‘देऊळ’ या मराठी सिनेमातील भूमिकेमुळे ती चर्चेत आली. आता पुन्हा एकदा सोनाली चर्चेत आहे ती ‘White Lilly आणि Night Rider’ या नाटकातील भूमिकेमुळे...रसिका जोशी या अभिनेत्रीने दिग्दर्शित आणि लेखन केलेले हे नाटक दिग्दर्शक मिलिंद फाटक पुन्हा रंगभूमीवर घेऊन आले आहेत. या नाटकात आधी रसिकाने केलेली भूमिका आता नव्याने बहुरंगी अभिनेत्री सोनाली साकारत आहे. या भूमिकेबद्दल आणि नाटकाच्या अनुभवाबद्दल तिच्याशी केलेली खास बातचीत...
* White Lilly Night Rider या नाटकाबद्दल सांग.
- ‘White Lilly आणि Night Rider’ हे आजच्या काळाचं नाटक आहे. म्हणजे ऎतिहासिक, सामाजिक, पुनरूज्जीवीत नाटकं आपण अनेक पाहिली आहेत. मात्र, या सर्वांच्या पलिकडे जाऊन आजच्या काळाचं प्रतिनिधित्व करणा-या काही स्क्रिप्ट असतात, त्यापैकी एक म्हणजे White Lilly Night Rider आहे.
* ब-याच कालावधीनंतर रंगभूमीवर आल्याचा अनुभव कसा आहे ?
- खरंतर मी चार वर्षांनंतर नाटक करती आहे. मधल्या काळात अनेक वेगवेगळी नाटकं करायला मिळाली. पण White Lilly Night Rider या नाटकाचा प्रवास माझ्यासाठी जास्त भावनिक होता. हे नाटक मला आधीही फार आवडायचं, खूप फॅन होते मी या नाटकाची...रसिका आणि मिलिंदचा तीसरा प्रयोग आणि त्यानंतर शंभरावा प्रयोग पाहिला होता. यादरम्यानचे जे काही प्रयोग होते, त्या प्रत्येक प्रयोगाला मी माझा ऑडिअन्स पाठवायचे. मी स्वत: तिकीटं काढून आणायचे, माझ्या मित्र-मैत्रीणींना पाठवायचे. जरी मी या नाटकाचे फक्त दोनच प्रयोग पाहिले होते. पण रसिका आणि मिलिंदच्या कामाने माझ्यावर वेगळाच प्रभाव पाडला होता. ‘नको रे बाबा’ या नाटकानंतर माझ्याकडे अनेक स्क्रिप्ट आल्या होत्या, पण नाटक करावं असं तेव्हा वाटत नव्हतं. कारण करायचं म्हणून करायचं असा माझा स्वभाव नाहीये. मात्र, जेव्हा मला White Lilly Night Rider साठी विचारलं तेव्हा एका क्षणाचाही विलंब न लावता मी काम करायला होकार दिला, कारण रसिकाचं या नाटकाला पहिलंच लेखन-दिग्दर्शन आहे, तिलाही या नाटकाचे प्रयोग सुरू राहणं नक्की आवडलं असतं. खरंतर या नाटकात काम करणं माझ्यासाठी मोठं आव्हान होतं.
* रसिकाने आधी ही भूमिका गाजवल्यानंतर तीच भूमिका परत करण्याचं दडपण होतं का ?
- आयुष्यात मी शंभर टक्के दाद दिलेल्या गोष्टी खूप कमी आहेत....त्यातली ही एक रसिकाची भूमिका आहे. त्यामुळे मी असं ठरवलं होतं की, मी या भूमिकेशी किंवा रसिकाशी स्पर्धा नाही करणार...कारण त्यात मी हरणार हे माहित आहे. त्यामुळे माझ्यापरीने ही भूमिका मला निभवायची होती. त्यात मला माझा सहकलाकार या नाटकाचा लेखक-दिग्दर्शक मिलिंद पाठक याची खूप मदत झाली. त्यांनीही माझ्यावर कधीच असा दबाव टाकला नाही की, हे रसिका अशी करायची तर तू ही तशीच कर....असं कधी झालंच नाही. अगदी नव्यानं हे नाटक आम्ही उभं केलं. माझ्या पर्सनॅलिटीला साजेशा अशा अनेक गोष्टी नाटकात आम्ही घेतल्या. आमच्या मुठीत होतं ती रिस्क घेणं आणि आम्ही ती रिस्क घेतली.
* रसिकाबद्दल आणि तिच्या कामाबद्दल काय सांगशिल?
- रसिकासारख्या माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्रीने स्वत: मोहर उमटवलेली भूमिका ही आहे. ती मला करायला मिळणं म्हणजे माझी परीक्षाच होती. रसिकाचं एक वेगळं व्यक्तीमत्व होतं. अनेक कलाकार आपल्याकडे आहेत, पण त्यांच्यापेक्षा ती खूप वेगळी होती. तिच्या unpredictable reaction मुळे खूप ताजेपणा यायचा. तिच्यात साचेबद्धपणा अजिबात नव्हता, तिच्या स्वभावातही नव्हता आणि तिच्या अभिनयातही नव्हता. तर हे सगळं सर्वांच्याच लक्षात राहिलेलं असणार...त्यावर माझ्याकडून प्रयत्न करून मी तीच व्यक्तीरेखा साकारण्याचा प्रयत्न करणं हे जरा कठीण होतं.
* रसिकाने केलेली भूमिका तू नव्याने या करीत असल्याने आधी नाटक बघितलेला प्रेक्षक पुन्हा नाटकाला येतोय, कशा प्रतिक्रिया असतात प्रेक्षकांच्या...?
- मला प्रत्येक प्रयोगाला किमान दहा प्रेक्षक असे भेटतात ज्यांनी रसिकाचं नाटक पाहिलं होतं. ते प्रेक्षक सांगतात की, ‘रसिकाने केलेली भूमिका तू कशी करतेस हे बघण्यासाठी आम्ही पुन्हा नाटकाला आलोय’. त्यांच्याकडूनही पावती मिळतीये कारण हे नाटक नवं झालंय. कारण कुठेही रसिकाची नक्कल करणं किंवा तिच्या सारखं करायचा प्रयत्न करणं हे आम्ही केलेलं नाहीये. म्हणजे ती आम्ही टाळलंही नाहीये आणि केलंही नाहीये. मला जे सुचेल ते अनुसरून मी भूमिका फुलवली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ती आवडत आहे. मला सांगून जातात माणसं की, ‘आम्ही जरा साशंकतेनेच आलो होतो, पण हरकत नाही तू पास झालीस’. सोबतच नवीन प्रेक्षकांना सूद्धा नाटक खूप आवडतंय. त्यांच्याही चांगल्याच प्रतिक्रिया येतात.
* एकाच नाटकासाठी अभिनेत्री आणि निर्माती म्हणून काम करण्याचं काय कारण ?
- खरं सांगू का...मी माझ्या प्रत्येक नाटकात काहीना काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजे जेव्हा केव्हा मी नाटक केलं तेव्हा प्रॉपर्टी आणि कॉस्च्युम डिपार्टमेंट मी बघून घेईन हे गृहीत धरलेलं असायचं. तर ह्यावेळी मला वाटलं, की अशा पद्धतीनं ऋण न घेता ती मदत करत राहतो, मग त्यापेक्षा का आपण आपल्या नाटकाला हक्कानी चोख बनवण्यामध्ये मदत करू नये...आणि आमचा ओरीजनल प्रोड्युसर दिनू पेडणेकर याने माझी विनंती मान्य केली. हे नाटक नव्याने उभं करायचं होतं आणि त्यामध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंटकडून जराही कसर राहू नये म्हणून प्रोडक्शनमध्ये यायचं ठरवलं. ओरिजनली व्हाईट लिली मला प्रोड्युस करायचंच होतं. पण तेव्हा ते राहून गेलं. तेव्हा रसिकाला मी विचारलं होतं की, मी या नाटकासाठी काय करू शकते. कॉस्च्युम करून झालेत, प्रॉपर्टी झाली, नाटक तयार आहे, तर काय करू...? पण तेव्हा राहूनच गेलं. पण आता तेवढ्याच ताकदीनं आम्ही प्रयोग करतोय. जेणेकरून पुढे प्रेक्षकांना सांगायला लागता कामा नये, की ह्या कारणाने आम्ही प्रयोग करू शकलो नाही.
* इतके वर्ष तू अभिनयक्षेत्रात काम करतेस तूला पर्सनली काय आवडतं ‘नाटक’ की ‘सिनेमा’ ?
- हा प्रश्न जरा मला अवघड आहे. माझ्या अभिनयाची सुरवात मी नाटकातनं केलीये. कसं असतं एकदा व्यसन लागल्यावर ते सोडवणं फार कठीण असतं. त्यात नाटकाचं व्यसन सुटू नये असं प्रत्येक कलाकाराला वाटतं. मला नाटक आवडतंच आणि शेवटपर्यंत आवडत राहणार...पण त्याचबरोबर सिनेमा हे फार वेगळं माध्यम आहे. त्यातली जी ताकद आहे ती नाकारण्यासारखी नाहीये. सिनेमामुळे मी आज जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकते. शेवटी आपली कला ही जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचावी यासाठीच ती सादर करत असतो. त्या अर्थानं मला सिनेमाही तेवढाच महत्वाचा वाटतो. दोन्ही क्षेत्रांचं तत्रं वेगळं आहे ते समजून काम करण्यामध्ये एक चॅलेन्ज आहे. ते चॅलेन्ज उचलायला मला मजा येते. अर्थातच सिनेमामुळे माझी ही जिवनशैली, सुबत्ता मिळालेली आहे. त्यामुळे त्याचं महत्व विसरून चालणार नाही. ‘नाटक हा माझा श्वास आहे,सिनेमा मी असंच करते’ जरी सरधोपटपणे या वाक्याला टाळी मिळत असली तरी हे माझ्याबाबतीत खरं नाहीये. सिनेमाही मी तितक्याच तन्मयतेने करते.
* सध्याच्या मराठी नाटकांबद्दल तूझं वैयक्तीक मत काय आहे ?
- मला एकूणच आपल्या मराठी रंगभूमीबद्दल फार आदर वाटतो, कारण इतर अनेक प्रादेशिक भाषा आहेत ज्यामध्ये नाटक अगदी लयाला जातंय. बांगला, गुजराती या भाषांमधील नाटकं सोडून....त्यात मराठी रंगभूमीवर इतके प्रयोग होताहेत, नाटकं पुनरूज्जीवीत होताहेत. मराठी कलाकार फार निर्भिड वाटतो मला....सिनेमात आल्यावरही मराठी नाटक करायला घाबरत नाही. या अर्थाने मला आपल्या अभिरूची संपन्न संस्कृतीला खूप दाद द्यावीशी वाटते की मराठी माणूस हा अतिशय चांगला प्रेक्षक असतो, चांगला वाचक असतो. त्यामुळेच आपल्याकडच्या सांस्कॄतिक घडामोडी तितक्याच जास्त प्रकारे प्रयोग करून लोकांच्यासमोर येतात. ह्याचा मला खूप आनंद आहे.
* इतक्या वर्षांचा हा अनुभव गाठीशी आल्यानंतर दिग्दर्शनाचा कधी विचार आला नाही का ?
- आता सध्यातरी मला असं वाटतं की मी जगातली बेस्ट असिस्टंट डिरेक्टर आहे. मी जे कुठलं प्रोजेक्ट करते सिनेमा किंवा नाटक त्यात माझ्या दिग्दर्शकाला हर प्रकारे म्हणजे एखादा हॉल बुक करणं असो किंवा सिनेमाच्या दिग्दर्शकाला कन्ट्युनिटी लक्षात ठेवून मदत करणं असो किंवा एखादी सूचना देणं असो किंवा एखादं वाक्य बदलण्यासाठी आग्रह धरणं हे सर्व मी करत असते. ह्याचा अनुभव मी जमा करतीये. मी वैयक्तीक प्रवधानामधनं दिग्दर्शक होण्याइतका शांतपणा माझ्यामध्ये अजून आलेला नाहीये. दिग्दर्शक गंमत म्हणून होता येत नाही. तसं होताही येतं पण माझा तसा स्वभाव नाही की चला दिग्दर्शन करून बघावं. त्यासाठी खूप ठेहराव लागतो आपल्यामधे, त्यामध्ये किंचीत अलिप्तपणा लागतो. तर थोडीशी मॅच्युरिटी आल्यावर मी कदाचित दिग्दर्शनाचा विचार करेन...
* पुढे काय प्रोजेक्टस-प्लॅन्स आहेत ?
- आता मी लोकसत्तामध्ये दुस-यांदा ‘सो कुल’ लिहितेय ज्याला वाचकांचा अप्रतिम प्रतिसाद आहे. सिनेमे मला जास्तीत जास्त चांगले करायचेत. मी याआधी निरागस म्हणण्यापेक्षा थोडं बोळचटपणे काम केलं होतं. माझा एखादा मित्र किंवा एखादा नवीन दिग्दर्शक आला आणि म्हणाला की आमच्याकडे पैसे नाहीयेत पण तू कर ना काम...तर त्या प्रोजेक्टसाठी मला खूप आस्था वाटायची आणि मी ते करायचे. याची तमा न बाळगता की ही माणसं सिनेमा रिलिज करतील का...? की फक्त सिनेमा करण्याचीच हौस भागवून घ्यायची आहे त्यांना....मात्र आता हे तपासून मी सिनेमा निवडते. नुसतंच करायचं म्हणून करायचं ठरवलं तर वर्षातले ३६५ दिवस आपण कुठेना कुठे रिबीनी कापायला जाऊ शकतो, शूटींग करू शकतो, वाट्टेल ते नाटक करू शकतो. रोज आपला फोटो पेपरमध्येही छापून येऊ शकतो. तर मी या विचाराने काम नाही करत. मला ह्याबद्दल कुठेतरी जाणवतं की मी नक्कीच थोडा खडतर मार्ग निवडतीये कारण त्यातून चटकन मिळणारी प्रसिद्धी मला नाही गाठता येत आहे. मला एवढंच कळतंय मी जो काही मार्ग निवडत आहे त्यातून मला आनंद मिळतोय. आणि जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपल्यासोबत चालणा-यांना आपण अधिक आनंद आणि समाधान देऊ शकतो. काम नक्कीच सुरू ठेवायचं पण त्यासाठी मला कुठेही असं वाटत नाही की माझं वैयक्तीक आयुष्य, माझे खाजगी आनंद याचा त्याग केला पाहिजे. आपण जर एक आनंदी कुटूंब निर्माण करू शकलो तर आपण आनंदी समाज नक्कीच निर्माण करू शकतो. आणि त्याचबरोबरीनं माझी एक धडपड नेहमी राहिलेली आहे की मी एक अतिशय सजग नागरिक म्हणून जगायचा प्रयत्न करते.
- अमित इंगोले