झिनी झिनी...

हल्ली असं फार जाणवतं, की माणसं व्यावसायिक नात्यांमध्ये चोख कामापेक्षा सोय शोधत असतात. म्हणजे काम बेताचं/पन्नास टक्क्यांपर्यंतच असलं तरी चालेल, पण माझ्या गतीशी, माझ्या स्वभावाशी त्यांनी जुळवून घेतलं पाहिजे. अनेक शेरे कानावर येतात. ‘माझी कुक इतकं तेल वापरते, पण दांड्या मारत नाही.’ ‘याला आताचा मेकअप करताच येत नाही, पण माझ्याबरोबर बारा वर्षं झालीत.’ ‘हा ड्रायव्हर नेहमी नियम मोडतो, पण वेळेवर येतो!’ अशी कारणं ऐकली की विस्मय वाटतो. कारण काही माणसं आपल्याला कधीच सवलत मागत नाहीत. उदा. शेतकरी. पीक चांगलं नाही आलं, तर विकलं जातच नाही. त्यामुळे तनमनधन अर्पून, बाळासारखं डोळ्यात तेल घालून जपलं तरच पीक तरारतं.

पण न तरारलेलं पीक शिताफीनं विकायची चतुराई असणारे पाहिले, की फार कुचंबणा होते. ज्या प्रकारच्या ‘हिट अँड हॉट’ नाटक सिनेमांची चलती आहे, त्याचं अवलोकनही करावंसं वाटत नाही. मार्केटिंग-हवा-बोलबाला... या लाटांमध्ये अनेक प्रोजेक्ट्स धकून जातात. पण फक्त धकण्यासाठीच प्रवाहात उडी घेतली असेल, तर यात कौतुक कसलं? फार कमी जणांना मध्यभागी डोलणार्‍या निळ्या कमळापर्यंत पोचायचं असतं; वाहत आलेल्या ओढणीचा पत्ता शोधायचा असतो; अडकून पडलेल्या ओंडक्याला मोकळं करायचं असतं; असं म्हटल्यावरसुद्धा एक मोकळा, आनंदी उच्छवास आपलाच आपल्याला ऐकू येतो. त्याविरुद्ध, हल्ली बुडता बुडता वाचणार्‍यांचा जल्लोष पाहून येतो बुवा कंटाळा. आपल्याला कुठेतरी हेच थरारनाट्य हवंसं झालंय का? पोहायला न शिकता टाकली उडी पुरात... आणि त्याचा होणारा उत्कंठावर्धक खेळखंडोबा बघायला लोटलं आख्खं गाव - अशी त-हा आहे!
अशा गोंधळात मात्र माझे पार्टनर फार सरस आहेत.‘पार्टनर’ या शब्दातच त्याचा अर्थ सामावलाय. पार्ट (अलग) न होणारा ‘पार्टनर’. त्यांच्यासह असण्यामध्ये, ते जिथे आहेत तिथे असण्याला आपल्यासाठी फार मोल असतं. म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे. पण माझे पार्टनर आहेत कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, मालिनी राजूरकर. शिवाय गेल्या पाच वर्षांतली भर संजीव अभ्यंकर, राशिद खान आणि श्रुती सडोलीकर. गाणं ऐकण्याची आपापली एक क्षमता असते. तसं मी एक गायक घेतला की मारे धुऊन त्यांच्या सगळ्या सीडी ऐकून टाकायच्या; सगळ्या सीडी विकत घेऊन संग्रह पूर्ण करायचा; किंवा ‘हो हो... मी त्यांची कबीराची भजनं वीस वर्षांपूर्वीच ऐकली आहेत,’ अशी फॅन नंबर वन होणार्‍या प्रांतातली मी नाहीये. मी एका गायकाबरोबर, एका गाण्याबरोबर काही वर्षं सहज राहू शकते. आता गेली काही वर्षं किशोरीतार्इंची ‘घट घट में पंछी बोलता...’ ही सीडी लावल्याशिवाय मी मेकअप सुरूच करत नाही. मीच काय, माझी हेअर/मेकअप टीमही माझा सीडी प्लेअर, वायरचा तामझाम येऊन गाणं लागेपर्यंत काम सुरू करत नाहीत. आम्हा सगळ्यांमधे ते संगीत एकतानता आणतं. आम्हा सगळ्यांना एकमेकांपर्यंत पोहोचता येतं. आम्ही सगळे न बोलता एका स्थितीला येतो.

एका गंभीर समाधानाच्या. मग दिवसभराचं काम चांगलंच होतं. अनेकदा मला वाटतं, की कुमारजींच्या गाण्यापर्यंत पोचण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसाधारण श्रोत्याला आयुष्य वेचावं लागेल, फार फार वेळ लागेल. त्यामुळे त्यांनी जिवंत नसणं किंवा या जगात नसण्यापर्यंत माझी झेपच जाणार नाही. माझ्यासाठी ते निरंतर आहेत.

ते आहेतच. ही पार्टनरशिप किती अजोड आहे! कुमारजींना ठाऊकही नसेल की त्यांचं गाणं माझं आयुष्य समृद्ध करतंय. त्यांचं गाणं कधीच स्वत:च्या पलीकडे गेलंय. पण मला त्यांच्याच स्वरांचा आधार आहे. एखादं माणूस आपल्या शहाणं असण्याचं कारण असावं, आणि त्याला याचा गंधही नसावा? अजून तरी मी स्वत:ला तंत्रज्ञानाच्या सोबतीनं शंभर टक्के स्वयंपूर्ण नाही केलेलं. मोबाइलच्या अ‍ॅपवर माझं आवडतं संगीत वाजायला रेडी नाही ठेवलेलं मी. मला अजूनही मिस करायला आवडतं विसरलेलं काहीतरी... गंमत अशी, की परगावी गेल्यावर ते नेहमीचं संगीत यंत्रात वाजत नसेल, पण ते मनात चालू असतं. थोडक्यात गाणं सुरू झाल्यानंतरची ती शांतता, समाधान मनात कायम असतं. ही पार्टनरशिपच आहे की. दुसर्‍या पार्टनरला सल्ले, शिकवण न देता, न भांडता त्याचं अनुभवविश्व वृद्धिंगत करणारी. याचं ऋण कसं फेडावं, कुठे फेडावं, आपलं आयुष्य उजळून टाकल्याबद्दल आपण कसं उतराई व्हावं?

त्याचा सोपा मार्ग म्हणजे आपल्याला मिळणारे सुहृद आपण जपायचे, पण त्यांना बांधून नाही घालायचं आपल्याच बॉँडपुरतं. आपला पार्टनर शेअर करायचा, म्हणजे शब्दश: कुमारजींचं गाणं असं नव्हे, पण त्या गाण्यामुळे आपल्यात नांदायला आलेली समज, शांतता, प्रसन्नता शेअर करायची. अनेकदा काही क्षणांमध्ये आपल्याला गवसलेलं सत्य उलगडून सांगणं फार अवघड असतं. पण आपणच ते सत्य झालो, तर आपल्या सहवासात सोबतच्या, आवडीच्या माणसांना ते जाणवणारच की. तर... या वर्धापन दिनाच्या अंकासाठी मी माझ्या अशाच काही मित्रांना हाक मारली, ज्यांचं सत्य मला जाणवलंय. शेअर करण्याच्या भावनेनं, वेगवेगळ्या कारणांनी आवडणारी सुहृद झालेली सुंदर माणसं मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. ऋणात बुडायला मी तयार आहे.

http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-sonali-kulkarni-article-about-partnership-4638057-NOR.html
 
;